मंचर (प्रतिनिधी) – पेठ (ता. आंबेगाव) येथील वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य आणि वार्ताहर अशोक पंढरीनाथ वळसे पाटील (वय ५८) यांचे हृदयविकाराने रविवार, दि. ५ रोजी सकाळीं ११ वाजून ३२ मिनिटांनी चाकण येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, वडील, भाऊ, असा परिवार आहे. अशोकराव वळसे पाटील यांनी भावडी येथील सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालयात अनेक वर्ष शिक्षण सेवा बजावली होती.
इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. सध्या ते पेठ येथील वाकेश्वर विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शुक्रवार, दि. ३१ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. तसेच आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य होते.
त्याची पत्नी निर्मला वळसे पाटील या साकोरे ता.आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. मुलगा सौरभ वळसे पाटील लंडन येथे उच्च शिक्षण घेऊन नुकताच तो घरी आला होता.
निरगुडसर येथील टेमकरवस्ती येथील पूर्वा दूध संस्थेचे माजी अध्यक्ष कांताराम वळसे पाटील यांचे ते धाकटे बंधू होत. अशोक वळसे पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले आयुष्य घडवले, मुलांना उच्च शिक्षण दिले. निरगुडसर येथील वैकुंठ भूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.