मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन न मिळाल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. तर तुरुंगाबाहेर त्यांच्या मुंबईतल्यानिवासस्थानावर मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण राणांच्या घरावर पालिकेकडून तशी नोटीस लावण्यात आली आहे.
सध्या तुरुंगात असणाऱ्या राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये घर आहे. या घरामध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला आहे. पालिकेचे अधिकारी ४ मे रोजी राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच हे अधिकारी आवश्यक मोजमाप घेऊन त्यानंतर त्यांना अवैध बांधकाम हटवण्यासाठी मुदत दिली जाईल. अवैध बांधकाम न हटवले गेल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात सध्या कोणीही राहत नाही. पालिकेकडून त्यांच्या घराच्या दारावर नोटीस लावण्यात आली आहे. अवैध बांधकामाचा उल्लेख या नोटिसीमध्ये करण्यात आला आहे. राणा दाम्पत्य कोठडीत असताना त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आल्यानं त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे.