1526 झाडे तोडण्यापूर्वी 25 हजार झाडे लावा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्‍यक असणारे पाणी पुरविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 1526 झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु ही झाडे तोडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने सामाजिक संस्थांना सोबत घेऊन 25 हजार झाडे लावावीत, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीच्या (इसीए) वतीने करण्यात आली आहे.

या बाबत इसीएने आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आणखी एक जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मनपाने चिखली परिसरातील मोकळी जागा निवडली व त्या जागेचा रितसर ताबा मिळविण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला आणि शासन मान्यताही मिळविली, हे कौतुकास्पद प्रयत्न आहेत. परंतु त्या जागेवर शासनाने अथवा स्थानिक वृक्ष प्रेमी मंडळीने लावलेली ग्लेरीसिरीयाची 1127 झाडे व इतर काही विदेशी झाडे काढून टाकावी लागणार आहेत. त्यामुळे चिखली परिसरातील काही प्रमाणात ग्रीन कव्हर कमी होणार आहे व पर्यावरणाची हानी नक्कीच होणार आहे. ती हानी पुन्हा भरून काढण्यासाठी अथवा टाळण्यासाठी प्रयत्न करावेत.

महापालिकेच्या मते जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ह्या जागे व्यतिरिक्‍त कोणतीही प्रशस्त व योग्य पर्याय चिखली परिसरात उपलब्ध नाही, ही तांत्रिक अडचण अभ्यासता आणि नागरिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेने वृक्षतोडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या नियमाचे पालन करावे. किंबहुना दीड हजार वृक्ष तोडण्यापूर्वी त्वरित महापालिका हद्दीत कमीत कमी 25 पंचवीस हजार झाडांची लागवड करावी. ही झाडे शहरातील नागरिकांच्या व सामाजिक संस्थांच्या सहभागाने करावी व त्यात पारदर्शीपणा नागरिकाना जाणवला पाहिजे. ही सर्व झाडे लावताना पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) ह्या संस्थेच्या पर्यावरण तज्ञ व पर्यावरण अभ्यासकांच्या मान्यतेने झाडांच्या जाती व प्रजाती निवडण्यात याव्या. यासाठी शहरतील वृक्ष प्रेमी पर्यवेक्षकाची भूमिका विनाशुल्क निभावतील, असा विश्‍वास ही व्यक्‍त केला आहे.

नवीन जागेवर पुन्हा कोणत्याही विदेशी झाडांचे रोपण करू नये, हे बंधन न पाळल्यास विदेशी झाडांच्या रोपणास कडाडून विरोध केला जाईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच जलशुद्धीकरणसारखा अत्यावश्‍यक प्रकल्प रखडला जावू नये आणि वृक्षारोपणासाठी सध्याच्या वातावरणानुसार शेवटची संधी आहे, यामुळे या बाबत गंभीरतेने त्वरित कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)