पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली. पंतप्रधानांनी तातडीने या निर्णयाला स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला.
भविष्यात देखील आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवणार, अशी ग्वाही अखिल भारतीय श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक युवक महासंघाचे आंतरारष्ट्रीय अध्यक्ष आणि अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सुनील जे. सिंघी यांनी दिली.
श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक युवक महासंघाच्या पुणे शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभाला सिंघी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक युवक महासंघाचे अध्यक्ष सतीश शहा, प्रदेशाध्यक्ष अचल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष हरेश शहा, जीतो एपेक्सचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, नवनिर्वाचित अध्यक्ष विलास शहा, सचिव समीर जैन आदी उपस्थित होते.
यावेळी २०२४-२५ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या अध्यक्षांसह २०२५-२६ या वर्षाच्या अध्यक्षपदासाठी ललित एस. गुंदेशा यांचे नावे घोषित करण्यात आले. तसेच महासंघाच्या कार्यकारीणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
एका अभ्यास अहवालानुसार आधीच अल्पसंख्यांक असलेला जैन समुदाय अजून अल्प होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही आपल्या समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. हे प्रश्न हातात घेऊन संघटनेने त्याची उत्तरे शोधण्याचे काम केले पाहिजे. जैन समाजाचे दस्ताऐवजीकरणे केले गेले पाहिजे. त्याद्वारे समाजातील समस्यांचे प्राधान्यक्रम ठरवून ते हाताळणे शक्य होईल, असे ओसवाल म्हणाले.
यावेळी भरत शहा यांनी मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचीत अध्यक्ष विलास शहा यांनी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष सतीश शहा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कार्याचा आढावा घेतला.