पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीकडून खास प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्री पाच मार्गांवर सुरू केलेल्या रातराणी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या रातराणी बससेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. प्रामुख्याने कात्रज ते शिवाजीनगर आणि कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांना आवश्यक असलेल्या पाच मार्गांवर सध्या रातराणी बस चालविल्या जात आहेत. या बस साधारण एक ते दीड तासाने मार्गावर धावत आहेत. प्रत्येक मार्गावर साधारण बसच्या आठ फेऱ्या होत आहेत.
रेल्वे, एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्सने विविध जिल्ह्यांसह राज्यातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी रिक्षा, टॅक्सी, ओला- उबर यांच्याकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. ज्यांना परवडते ते जातात. मात्र, ज्यांना हे भाडे परवडत नाही, अशा प्रवाशांसाठी शहरातील प्रमुख पाच मार्गांवर पीएमपीकडून रातराणी बससेवा सुरू केली आहे.
त्यामध्ये कात्रज-शिवाजीनगर-कात्रज, कात्रज-पुणे स्टेशन-कात्रज, हडपसर-स्वारगेट-हडपसर, हडपसर-पुणे स्टेशन-हडपसर, पुणे स्टेशन-एनडीए गेट-पुणेस्टेशन अशा पाच मार्गांवर ही बस धावते. रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत ही सेवा दिली जात असल्याने, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून पीएमपीला दरमहा जवळपास 5 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, बस चालकांनी देखील बस सुटणाऱ्या स्थानकावर उभे राहून आवाज देत प्रवाशांना बोलवावे, अशा सूचना पीएमपीकडून करण्यात आल्या आहेत.
पीएमपीला तीस लाखांचे उत्पन्न
मागील सहा महिन्यांत रातराणी बसचा 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यातून पीएमपीला पासचे उत्पन्न वगळता थेट तिकीट विक्रीतून पीएमपीला 30 लाख 85 हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यामध्ये कात्रज-पुणे स्टेशन आणि कात्रज-शिवाजीनगर या मार्गांवर प्रवासी संख्या तुलनेने अधिक आहे. सरासरी महिना एक लाखाच्या आसपास आहे, तर अन्य मार्गांवर 60 ते 90 हजार प्रवासी संख्या आहे.
रातराणीच्या पाच मार्गांच्या वेळा
– कात्रज ते वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) – १०.४०, मध्यरात्री १२.१५, पहाटे २.२०, ३.५५ आणि ५.२०
– वाकडेवाडी स्थानक (शिवाजीनगर) ते कात्रज- ११.३०, मध्यरात्री १, पहाटे ३.१०, ४.४०
– कात्रज ते पुणे स्टेशन – ११, मध्यरात्री १२.३०, पहाटे २, ३.२५, आणि ५
– पुणे स्टेशन ते कात्रज- ११.५०, मध्यरात्री १.२०, २.४०, पहाटे ४.१०
– हडपसर ते स्वारगेट- १०.५०, ११.४०, मध्यरात्री १, पहाटे ३.४५ आणि ५
– स्वारगेट ते हडपसर- ११.५० मध्यरात्री १२.२०, पहाटे १.४०, ४.१५
– हडपसर ते पुणे स्टेशन- १०.४०, मध्यरात्री १२, पहाटे २.५०, ४.०५ आणि ५.१५
– पुणे स्टेशन ते हडपसर- ११.२०, मध्यरात्री १२.४०, पहाटे ३.२५ आणि ४.३५
– पुणे स्टेशन ते एनडीए गेट- १०, मध्यरात्री १२.३०, पहाटे ३.४५, ६.१५
– एनडीए गेट ते पुणे स्टेशन- ११.१५, मध्यरात्री १.४५, पहाटे ५.