पत्रकारांच्या टीमच्या मागणीची गटविकास अधिकाऱ्यांकडून दखल
पौड – मुळशी पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरच्या प्रवेशद्वाराजवळील अडचण अखेर दूर झाली आहे. या प्रवेशद्वारापाशी सिमेंटचे कॉंक्रीटीकरण करण्यात आल्याने दगड-धोंडे, गवत व खाचखळगे या अडचणींचा सामना आता करावा लागणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विकलांग नागरिक यांची समस्या दूर झाली आहे.
मंगळवारी (दि. 6) पत्रकारांच्या टीमने याबद्दल गटविकास अधिकारी संदीप जठार यांना ही अडचण दूर करण्याची विनंती केली होती. जठार यांनी लागलीच यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यास सांगितले. दोनच दिवसानंतर आज हे कॉंक्रिटीकरण झाल्याने पत्रकारांच्या मागणीला यश आले आहे. पत्रकार बंडू दातीर, विनोद माझिरे, विजय वरखडे, दीपक सोनवणे, सचिन केदारी, रामदास मानकर, तेजस जोगावडे, पप्पू कंधारे यांनी ही विनंती केली होती.
तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये असलेल्या प्रवेशद्वाराचा अडसर नागरिकांना सतावत होता. जमिनीच्या वर अर्धा-पाऊण फूट प्रवेशद्वाराचा लोखंडी बार येत असल्याने त्यावर उडी मारत सांभाळून प्रवेश करावा लागायचा. तो इतका त्रासदायक होता की साडी परिधान करून येणाऱ्या महिला-भगिनी, वयोवृद्ध नागरिक, विकलांग बांधव यांना ते खूपच अडचणीचे ठरत होते. सुदैवाने आता ही अडचण दूर झाली असून गटविकास अधिकारी संदीप जठार यांचे पत्रकारांनी आभार मानले आहेत.