पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा एक हजार कोटी मिळकत कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु 631 कोटींची थकबाकी आहे. यात सुमारे 3850 मिळकतधारक असे आहेत ज्यांनी आजपर्यंत एकदाही मिळकत कर भरला नाही. तसेच अन्य थकबाकीदारांची संख्या देखील 26 हजारांहून अधिक झाली आहे. यामुळे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आता कठोर भूमिका घेत शहरातील 31 हजार 971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीस पाठविल्या आहेत.
कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत. तसेच या मिळकत धारकांकडे तब्बल 631 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
आतापर्यंत तीनशे कोटींचा भरणा
शहरात 5 लाख 79 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत सुमारे तीनशे कोटी रूपये कराचा भरणा केला आहे. महापालिकेच्या 17 विभागीय कार्यालयामार्फत कर संकलानांचे कामकाज केले जाते. गतवर्षी कर संकलन विभागाने 625 कोटी कर वसूल केला होता. यंदा मात्र, 1 हजार कोटी रूपयांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले. त्यादृष्टीने सातत्याने नव-नवीन योजना राबवत आहेत. माझी मिळकत माझी आकारणी यो योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती कर कक्षेत आल्या आहेत. तसेच जनसंवादच्या धर्तीवर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवादचेही आयोजन करण्यात येत आहे.
तर जप्तीची कारवाई करणार
कर संकलन विभागाने शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मिळकत धारकांची यादी काढली आहे. त्यानुसार 31 हजार 971 मिळकत धारकांना आपली मालमत्ता जप्त का करू नये, अशा नोटीस धाडल्या आहेत. या सर्व मिळकत धारकांकडे शास्तीकर वगळून तब्बल 631 कोटी रूपयांची थकबाकी आहे. या सर्व मिळकत धारकांनी लवकरात-लवकर कर भरून, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच त्वरीत कर न भरल्यास मिळकती जप्ती करण्यात येतील, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
“त्यांच्या’कडे 23 कोटी 25 लाखांची थकबाकी
मालमत्ता बांधल्यापासून एकदाही कराचा भरणा न केलेल्या मिळकतींची आकडेवारी समोर आली आहे. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये या 3 हजार 850 मिळकत धारकांना कर संकलन विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. त्यांच्याकडे 23 कोटी 25 लाखांची थकबाकी आहे.
कर संकलन विभाग तीन टप्प्यांत थकीत मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1 हजार 361 व्यावसायिक मालमत्तांवर, दुसऱ्या टप्प्यात मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मिळकत धारकांवर तर तिसऱ्या टप्प्यात 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760 धारकांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच करसंकलन विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आग्रही आहेत. 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत.
– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग