राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, नागरिकांची लवकरच बैठक
खासदार सुळेंचे आश्वासन : प्रत्यक्ष रस्त्याची केली पाहणी
जवळार्जुन – जेजुरीतून जाणाऱ्या पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. 12) प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली आणि अन्यायग्रस्त बाधित गोरगरीब नागरिक व महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. यासाठी नागरिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेवून याप्रकरणी योग्य मार्ग काढला जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाकरिता जेजुरी शहरामध्ये सर्वेक्षण व मोजणी करण्यात आली . शहरातून जाणाऱ्या व अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या खुणा न करता केवळ उत्तरेकडील बाजूला रुंदीकरणाच्या खुणा करून केवळ एकच बाजूची जागा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न असल्याने नागरिक व व्यावसायिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्या संदर्भातील संबधित शासकीय विभाग हे नागरिकांना खरी माहिती नसल्याने नागरिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले. यावेळी जेजुरी पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, विजय झगडे, नितीन राऊत, रियाज पानसरे, सागर काकडे, हरिभाऊ काकडे, रामभाऊ काकडे, गणेश खोमणे, अतुल खोमणे, संदीप खोमणे, आयुब पानसरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भातील नागरिकांची भावना आणि अधिकाऱ्यांनी केलेले मोजमाप याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल महामार्गामुळे होणाऱ्या बाधित नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही.
– दिलीप बाराभाई, माजी विरोधी पक्ष नेते, जेजुरी नगरपालिका