पुणे – करोनाच्या विषाणूची तपासणी सद्य:स्थितीत शहरातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही)मध्येच होते. दरम्यान, खासगी लॅबला तपासणीचा अधिकार देण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे यावर धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
शहरात फक्त एनआयव्हीमध्येच करोनाच्या तपासणीची सोय असल्यामुळे तेथे गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे ही तपासणी खासगी लॅबमध्ये करण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. सध्यातरी खासगी लॅबला परवानगी दिलेली नसल्याची माहिती म्हैसेकर यांनी दिली.
खबरदार… अफवा पसरवाल तर होणार कारवाई
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यापासून वाचण्यासाठी काय खावे, काय खावू नये, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर या विषाणुची लागण होणार नाही. असे अनेक आशयाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, भारतात करोना विषाणूने शिरकाव केला आणि करोनापेक्षा सोशल मीडियावरील मेसेजचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. मात्र, हा प्रादुर्भाव चुकीच्या पद्धतीने पसरविला जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना विचारले असता, चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पाठविणारे व्यक्ती आणि ग्रुपवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: तरुणांनी ग्रुपवर आलेले चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये. तसेच अधिकृत माहिती नसताना एवढे रूग्ण सापडले, रूग्ण दगावला, प्रादुर्भाव वाढतो अशी अफवा फसरवू नये. अन्यथा या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
करोना रुग्णांच्या कुटुंबीयांवर भीतीपोटी बहिष्कार
करोना बाधित रुग्णांची माहिती सोशल मीडियावरून पसरू लागली आहे. काही ठिकाणी रुग्णाचे नाव आणि पत्ता व्हायरल झाला आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या कुटुंबीयांवर आजूबाजूच्या नागरिकांनी भीतीपोटी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे एका रुग्णाने विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणी दाद मागितली आहे. तसेच इतर रुग्णांची माहिती उघड करू नये. याबाबत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, कोणत्याही माध्यमांमधून रुग्णांची माहिती व ओळख उघड करण्यात येऊ नये, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
“करोना’वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी. शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाच्या संपर्कात असून वेळोवेळी तयारीचा आढावा घेत आहे. बाधित रुग्णांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय, महापालिकेकडून आणखी दोन विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहेत.
– गिरीश बापट, खासदार