सोन्याला नवी झळाळी ! (अग्रलेख)

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसते आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांना, सोन्याला महत्त्व दिले जात असल्याने देशात सोन्याला मोठी मागणी आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याची मागणी असणारा देश आहे. सोन्याची ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला सोने आयात करावे लागते. त्यामुळे मंदीच्या काळात सोन्याची मागणी कमी असणे, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीमुळे सध्या सोन्याची आयात कमी झाल्याने व्यापारतूटही कमी झालेली आहे.

भारतासारख्या विकसनशील देशाला सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर नाही. प्रतिवर्षी जीडीपी मधील 3 टक्‍के रक्‍कम ही सोन्याच्या खरेदीच्या रूपात खर्च होते आणि हा अनुत्पादक खर्च आहे. या वर्षीच्या म्हणजेच 2019च्या सुरुवातीपासून देशात सोन्याची आयात कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे दिवाळी सारख्या सणावारांच्या काळात सोन्याला जास्त मागणी असते, साहजिकच भारताची सोन्याची आयातही वाढते. या वर्षी मात्र मंदीचा प्रभाव पडलेला दिसतो आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास सोन्याची आयात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खालच्या पातळीवर आली आहे. गेल्या महिन्यात भारताने 26 टन सोने आयात केले होते.

एक वर्षापूर्वीच्या 81.71 टनापेक्षा ते कमी आहे. या महिन्यात म्हणजेच ऑक्‍टोबरमध्ये सोन्याची मागणी वाढली तरीही सोन्याची आयात 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहाण्याची लक्षणे दिसताहेत. सध्या देशातच नव्हे तर जगातच सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अर्थात सामान्यांसाठी न परवडणारे सोने हे मोठ्या गुंतवणूकदारांसाठी मात्र लाभाची संधी घेऊन येते. देशच नव्हे तर जगभरातच अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे. जमीन व्यवहार थंड पडले आहेत.

शेअरबाजारातही चढ-उतार कायम आहे. सोन्याचे भाव वाढलेले असले तरीही मंदीच्या परिस्थितीतही सोन्यातील गुंतवणूक ही छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि आकर्षक पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मतेही शेअरबाजार, रिअल इस्टेट आणि सोने या गोष्टींतील गुंतवणूक ह्या सर्वाधिक लाभ देणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सोन्यातील गुंतवणूक फारशी फायदेशीर न ठरताही गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारतात गुंतवणुकीसाठी चार मोठे पर्याय आहेत.

सोने, रिअल इस्टेट, शेअरबाजार आणि बचत योजना. गेल्या काही वर्षांत म्हणजे 2013 नंतर सोन्याची गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असणारी चमक कमी झाली आहे. त्याचवेळी सरकारने सोन्यावरील आयातशुल्क वाढवून सोन्याच्या आयातीवर निर्बंध लावल्याने सोने खरेदीदारांच्या उत्साहाला लगाम लावला होता. त्यामुळे सर्वोच्च पातळी गाठलेल्या सोन्याच्या भावात वेगाने घट झाली. या काळात शेअरबाजार मात्र तेजीत होता. रिअल इस्टेट हा देखील महत्त्वाचा गुंतवणुकीचा वर्ग आहे.

मात्र, या क्षेत्रातही सध्या अनेक नियम, कर लागू करण्यात आले आहेत; शिवाय ही मालमत्ता विकणे सोपे नसल्याने हे क्षेत्रही तसे कमजोर झाले आहे. त्याशिवाय दीर्घ कालावधीतील रिअल इस्टेटमधील उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध नाही शिवाय देशभरात रिअल इस्टेटमधील उत्पन्नाची आकडेवारीही समान नाही. दुसरीकडे गेल्या चार दशकांतील शेअरबाजाराची आकडेवारी उपलब्ध आहे, त्यांचा अभ्यास करता शेअऱबाजारात चांगले उत्पन्न मिळाले आहे. मात्र, गेल्या एक दशकभरात सोन्यातून मिळणारे उत्पन्न हे शेअरबाजारापेक्षाही अधिक आहे.

देशात सोने सर्वोच्च पातळीवर पोहोचणे आणि गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा हिस्सा वाढवण्याच्या चर्चा यामुळे गुंतवणुकीचे हे दृष्य बदलते आहे. इतर सर्व मालमत्ता किंवा गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करता सोन्याच्या या पिवळ्या धातूची अनेक वैशिष्ट्ये आहेत. इतर आर्थिक बाजारांच्या विशेषतः शेअरबाजाराच्या तुलनेत सोने बाजाराचे अंदाज वेगळे असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याची काऱणेही वेगळी असतात. भारतात सोने कुटुंबाची गरज असतेच पण भारतीय संस्कृतीत सोन्याचे दागिने अंगावर घालण्याची परंपरा किंवा रित आहे. त्याव्यतिरिक्‍त धार्मिक आस्था, देवावरील श्रद्धा म्हणूनही लोक मंदिरात देवाच्या पायी सोने वाहतात.

सोन्याच्या वाढत्या किमती आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा आलेख पाहता चालू वर्षात म्हणजे 2019-20 मध्ये पहिल्या पाच महिन्यांत एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानच्या काळात सोन्यातील गुंतवणूकदारांना 22 टक्‍के जास्त फायदा मिळाला आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे 2018-19 सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 10 टक्‍के फायदा मिळाला होता. या महिन्यात सोन्याच्या किमती गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते, या वर्षीच्या शेवटापर्यंत सोने प्रति दहा ग्रॅम 42 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता आहे.

जगभरात सोन्याच्या दरात किमतीत वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बॅंका डॉलरच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणुकीला महत्त्व देत आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. यामागचा उद्देश म्हणजे अमेरिकन डॉलरचे महत्त्व कमी करणे. रशिया, चीन आणि भारत यासह जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बॅंकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 613 टन सोने खरेदी करून जगातील दहाव्या क्रमांकाची सोने खरेदी करणारी बॅंक झाली आहे.

जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्‍त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हेच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.