पुणे- करोनावरील संसर्ग शोधण्यासाठी नागरिकांच्या केल्या जाणाऱ्या तपासणीचा (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) वेग महापालिका प्रशासनाने कमी केला आहे. सुमारे एक हजारने ही चाचणी कमी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
“स्वॅब कलेक्शन सेंटर’ मध्ये शनिवार आणि रविवार अशा अर्ध्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी दिली जात आहे. त्यामुळे या दोन दिवसांत स्वॅबचे कलेक्शन कमी होते. याशिवाय वेळेत सॅम्पल लॅबमध्ये पोहोचण्यासाठी कलेक्शनच्या वेळाही कमी केल्या आहेत. मात्र “आयसीएमआर’च्या सूचनांनुसार तपासण्या होत असून मुळातच बाधितांची टक्केवारी कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवण्याच्या “आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार गेल्या तीन-चार महिन्यांत त्या वाढवल्या आणि आतापर्यंत एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वाआठ हजार नागरिकांची तपासणी केल्याची नोंद आहे. मात्र, त्या प्रमाणात रुग्णांचा आकडा वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला. त्यानंतर तपासण्यांची संख्या कमी करीत, ती साडेसहा-सात हजारापर्यंत कमी करण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्याप्रमाणात रस्त्यांवर उतरले त्यामुळे बाधितांची संख्याही वाढली. सुमारे अडीच हजारांपर्यंत बाधित एका दिवसात सापडले. त्यावेळी रोजची तपासणी सात हजारांच्या घरात होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून आता पुन्हा तपासणी कमी करण्यात आली आहे.
दिनांक (सप्टेंबर) – तपासण्या – रुग्ण
29 – 5 हजार 678 – 1 हजार 40
28 – 3 हजार 212 – 779
27 – 5 हजार 614 – 1 हजार 548
26 – 5 हजार 503 – 1 हजार 637
25 – 6 हजार 142 – 1 हजार 621
24 – 5 हजार 642 – 1 हजार 520
23 – 6 हजार 463 – 1 हजार 789