नवी दिल्ली: भारताने करोनाबाधितांच्या संख्येत 100 वरून 1 लाखाचा पल्ला 64 दिवसांत गाठला. करोनाबाधितांच्या संख्येत जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिका आणि स्पेनपेक्षा तो कालावधी दुपटीपेक्षा अधिक आहे.
अमेरिकेला 100 वरून 1 लाख ही करोनाबाधितांची संख्या गाठण्यास 25 दिवस लागले. स्पेनने तो टप्पा 30 दिवसांत गाठला. जर्मनीत 35 दिवसांत, इटलीत 36 दिवसांत, फ्रान्समध्ये 39 दिवसांत तर ब्रिटनमध्ये 42 दिवसांत करोनाबाधितांचा आकडा 100 वरून 1 लाखपर्यंत पोहचला. त्यामुळे करोना फैलावाबाबत भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली असल्याचे सूचित होत आहे.
भारतात सोमवार सकाळपासून 24 तासांत 4 हजार 970 नवे करोनाबाधित आढळले. तेवढ्याच कालावधीत देशात करोना संसर्गामुळे 134 रूग्ण दगावले. भारतातील सुमारे 40 हजार रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. ती घडामोडही भारताच्या दृष्टीने सकारात्मक ठरत आहे.