मुंबईतील आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संख्येत रोज हळूहळू वाढ होत चालल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 47 वर पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईवरून परतलेल्या उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. राज्यात या विषाणूच्या बाधितांची संख्या गुरुवार सकाळपर्यंत 47 वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणूची तिची चाचणी सकारात्मक आली आहे. तर युकेवरुन परतलेल्या 22 वर्षीय मुंबईतील तरुणीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळी या दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. देशात महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही सर्वाधिक आहे.
सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत 50 टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे आणि गजबजलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात दादर, माहिम, धारावी या भागातील केमिस्ट आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने एक दिवसाआड बंद राहाणार आहेत.