लोणी काळभोर- हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, शेवाळेवाडी व फुरसुंगी या पाच गावांमध्ये शनिवारी (दि. 27) दिवसभरात करोनाचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या सहा दिवसांत संख्या 60वर पोहोचली आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मागील पाच दिवसांत आढळून आलेल्या 48 रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्रमंडळी अशा 105 जणांचे स्वॅब शुक्रवारी (दि. 26) लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून सकाळी तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते.
या 105 जणांचे अहवाल येणेबाकी असतानाच, शनिवारी सकाळी 53 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. मागील दोन दिवसांत पाठवलेल्या 188 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतर हवेली तालुक्यातील पूर्व भागातील रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
लोणी काळभोर व थेऊरमध्ये जनता कर्फ्यू…
करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, लोणी काळभोर व थेऊर या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवार (दि. 27) पासून जनता कर्फ्यू सुरू केला असून तो तीन दिवस कडकडीत पाळण्यात येणार आहे. यात भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आले असून केवळ आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवाही ठराविक वेळेत सुरू ठेवल्या आहेत.