पुणे – शहरात पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डागडुजी करण्यापूर्वी खड्ड्यांतील पाणी न काढताच त्यात डांबरमिश्रित खडी टाकून ते दुरुस्त केले जात आहेत. त्यामुळे हे खड्डे पुन्हा उखडण्याची शक्यता असून, हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
शहरात अजून मान्सूनने जोर धरलेला नाही. तरीही, मोठ्या प्रमाणात रस्ते खड्डेमय झाले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांकडून ही रस्ते दुरुस्ती सुरू आहे. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये पावसाचे पाणी साठल्याने आतील भागात रस्त्याला खड्डे पडले आहेत. तर, पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या यंत्रणेत कचरा साठल्याने येथे वारंवार पाणी साठून गाळ तयार झाला आहे. तसेच मोठया प्रमाणात खड्डेही पडले आहेत. त्यामुळे पथ विभागाने शनिवारी येथील रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे. या वेळी साचलेला गाळ आणि पाणी काढणे अपेक्षित होते. मात्र, पाण्यातच डांबर टाकून रस्ता दुरूस्त केला जात असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. त्यामुळे एकूणच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.