लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मोझांबिकच्या विद्यार्थ्याला दिलासा
– सुनील राऊत
पुणे – लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या शेकडो मजूर आणि बेघरांना महापालिकेचा आसरा मिळलेला असतानाच, या निवारा सुविधेत चक्क एका परदेशी नागरिकालाही आसरा मिळाला आहे. मोझांबिक देशातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला हा नागरिक असून ऍरो ज्युनिअर असे त्याचे नाव आहे.
मार्चमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर लॅपटॉप, गाडी, तसेच इतर साहित्य विकून ऍरोने आपल्या देशात जाण्यासाठी विमानाचे तिकिट बुक केले होते. मात्र, विमानसेवाही बंद झाल्याने ऍरोला कोंढवा येथील संत गाडगेबाबा शाळेतील शेल्टरमध्ये आसरा घ्यावा लागला. पालिकेने लॉकडाऊन काळात 27 शाळांमध्ये हे शेल्टर सुरू केले आहेत. त्यात परराज्यांतील सुमारे 1,150 तर राज्यातील 618 जण वास्तव्यास आहेत. त्यांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंसह जेवण, नाष्टा तसेच मनोरंजनासाठी पुस्तकेही काही ठिकाणी दिली जात आहेत.
कोंढवा भागात राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या ऍरोने लॉकडाऊन सुरू होताच थेट पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या शेल्टरमध्ये पाठवले. तेथे तो सामान्य नागरिकांप्रमाणे राहत असून, भाषेच्या अडथळा असला, तरी ऍरो या शेल्टरमध्ये चांगलाच रमला आहे. शाकाहारी अन्न फारसे खात नसलेला ऍरो मात्र या शेल्टरमध्ये मागील 40 दिवसांपासून शाकाहारी अन्न खात असून, त्यातही पोळी-भाजी आपल्या अधिक पसंत असल्याचे तो सांगतो.
“सुरूवातीला येथे आपला निभाव लागेल का अशी शंका होती. मात्र, येथील नागरिकांनी दिलेले प्रेम तसेच काही ना काही शिकण्यास मिळत असल्याने आता हे सर्व जण माझ्या घरातीलच आहेत,’ असे ऍरो सांगतो. या ठिकाणी सुविधा आणि चांगले जेवण मिळते. त्यामुळे आपल्याला येथे राहण्यास काहीच अडचण नसल्याचे ऍरोने या शेल्टरच्या व्यवस्थापकांना सांगितल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.