पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात केलेल्या चुकीच्या नियुक्त्यांची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दखल घेत आयुक्तांना याबाबतचा जाब विचारला. “दै. प्रभात’ने नुकतेच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे प्रमुखपद हे स्थायी स्वरुपाचे असून या पदावर सध्या मानधनावरील डॉ. राजेंद्र वाबळे यांची नियुक्ती केली आहे. डॉ. वाबळे हे अस्थायी स्वरुपात महापालिकेत कार्यरत असून त्यांच्या नियुक्तीपत्रात प्रशासकीय व आर्थिक स्वरुपाचे अधिकार देता येणार नसल्याचे म्हटले आहे. असे असतानाही सत्ताधाऱ्यांमधील दोन पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी डॉ. वाबळे यांच्याकडे वायसीएमचा पदभार दिला आहे.
आयुक्तांनीही चुकीच्या नियुक्त्यांना पाठींबा दिला आहे. वायसीएममधील या चुकीच्या नियुक्त्यांबाबत दै. प्रभातमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत डॉ. कोल्हे यांनी आयुक्तांना याबाबत विचारणा केली. चुकीच्या नियुक्त्या करू नका, अशा सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या.