प्रवाशांना “टाटा’ करत “एसटी’ची धूम

वाई-सातारा मार्गावरील प्रकार, प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया

सातारा – सकाळच्या सत्रात कामावर जाणारे नोकरदार तसेच विद्यार्थी महामार्गावर बराचवेळ एसटीची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, एसटी चालक या विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना टाटा करुन अर्धवट भरलेली एसटी न थांबवता तशीच दामटत आहेत. वाई ते सातारा दरम्यान हा खेळ वारंवार सुरु आहे. त्यामुळे प्रवाशी अक्षरश: वैतागून गेले असून संबंधित चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वाई शहरातून तसेच तालुक्‍यातून सातारा शहरात कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. यापैकी सर्रास विद्यार्थी तसेच अनेक नोकरदार हे एसटी बसनेच प्रवास करत असतात.

मात्र, अपुऱ्या बसेस आणि चुकीच्या वेळा यामुळे या प्रवाशांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वाई आगारातील अनेक चालक हे बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या प्रवाशांना बगल देत अर्थवट भरलेली एसटी तसेच पळवत आहेत. विशेषत: पाचवड पासून पुढे उडतारे, विरमाडे, आनेवाडी, रायगाव, गौरीशंकर, लिंब, नागेवाडी, रामनगर, वर्ये, सैदापूर, मोळाचा ओढा हे स्टॉप आहेत. या स्टॉपवर पहाटे सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. या सर्व थांब्यांवरीलविद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना वाई-सातारा या एकमेव एसटी बसने प्रवास करावा लागतो.

परंतु, बस संख्या अुपऱ्या असल्याने तसेच वेळेत एसटी बस येत नसल्याने या सर्व प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते. याशिवाय अनेक महाभाग एसटी चालक हे बसमध्ये प्रवाशी कमी असले तरी एसटी फुल्ल झाली आहे. पाठीमागून येणाऱ्या एसटीने या, पाठीमागून आलेली एसटी मोकळीच आहे असे सांगून धूम ठोकत आहेत.

तर पाठीमागून आलेल्या एसटीचे चालक मोकळी एसटी असतानाही हातानेच जागा नसल्याचे खुणवत न थांबताच एसटी दामटत आहेत. याप्रकरणी आगार व्यवस्थापकांकडे वारंवार दाद मागितली आहे. मात्र यावर काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे जिल्हा एसटी प्रशासनानेच ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

मी सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मला दररोज एसटीनेच प्रवास करावा लागतो. मात्र, वेळेत एसटी बसेस न येणे, तसेच काही चालक जाणीवपूर्वक एसटी थांबवत नसल्याने माझे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर एसटी प्रशासनाने ठोस कार्यवाही करुन माझ्यासह इतरही विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबवावे.

स्नेहल भोसले, विद्यार्थिनी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.