ऍम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : ऍम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात ऍम्फान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीच्या दक्षिणेत असलेले हे वादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. येत्या काही तासात याचे रुपांतर भीषण चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधील दीघा आणि हटिया इथे 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस बंगालच्या खाडीत प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार आधीच समुद्रात आहेत, त्यांना परतण्यास सांगितले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील आठ राज्यांवर जाणवू शकतो. परिणामी इथे जोरदार पाऊस आणि आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटांवरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंहपूर, गजपती, नयागड, कटक, केंद्रपाडा, खुर्दा आणि पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे तामिळनाडूतही ऍम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. रविवारी वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली तसेच मोठे नुकसानही झाले. कोईम्बतूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे कोसळल्याचे वृत्त आहे.

चक्रीवादळाचा धोका पाहता खबरदारी म्हणून सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सोय केली आहे. जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या समुद्रकिनाऱ्यावरील चार जिल्ह्यांवर नजर ठेवून आहोत, अशी माहिती ओदिशाचे विशेष बचाव आयुक्त पीके जेना यांनी दिली.  ऍम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपली 17 पथके  तैनात केली आहेत आणि इतर पथकांना तयार राहण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या एका पथकात सुमारे 45 जणांचा समावेश असतो. एनडीआरएफ परिस्थितीवर देखरेख ठेवून आहे. आम्ही राज्य सरकार, हवामान विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती एनडीआरएफचे संचालक एस एन प्रधान यांनी व्हिडीओ मेसेजद्वारे दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.