सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात अनागोंदी कारभार केला. विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांवर झाले. सभासदहितापेक्षा त्यांनी स्वहिताचा कारभार केल्याने जिल्ह्यात सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड रोष असल्याने या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेलला सभासद बॅंकेची सत्ता देतील, असा विश्वास शिक्षक समितीचे नेते व बॅंकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी व्यक्त केला.
सभासद परिवर्तन पॅनेलच्या वाई तालुक्यातील ओझर्डे, बावधन, भुईंज, पाचवड येथील प्रचार दौऱ्यादरम्यान श्री. माने बोलत होते. यावेळी गटातील उमेदवार नितीन फरांदे व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार किरण यादव, अनिल पिसाळ, महादेव क्षीरसागर, शिवाजी शिंदे, शशिकांत कदम, सतीश फरांदे, किसन खताळ, पृथ्वीराज निकम, शरद फरांदे, बा. की. गायकवाड, बी. डी. भोसले, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.
विठ्ठल माने म्हणाले, “”सभासद परिवर्तन पॅनेलचा झंझावाती प्रचार सुरु आहे. महाराष्ट्र शिक्षक संघ, शिक्षक समिती, अखिल सातारा शिक्षक संघ (दोंदे गट) एकत्र आल्याने विरोधकांची पळता भुई थोडी झाली आहे. समोर पराभव दिसून लागल्याने पॅनेलच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीकाटिपणी होत आहे. सूज्ञ मतदारांनी त्यांचा ढोंगीपणा ओळखला असून या निवडणुकीत सभासदच त्यांना घरचा रस्ता दाखवतील. वाई तालुक्यात शिक्षक बांधवांनी बॅंकेत परिवर्तन करण्याचा चंग बांधला आहे.”
किरण यादव म्हणाले, “”सभासद परिवर्तन पॅनेलची बॅंकेवर सत्ता येणार असल्याने सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी झाली आहे. परिवर्तन पॅनेलवर बोलण्यासारखे काही नसल्याने व्यक्तीगत टीका होत आहे. बॅंक तोट्यात घालवून सभासदांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात सभासदांमध्ये संतापाची लाट आहे.” या निवडणुकीत मतदानातून हा रोष बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नितीन फरांदे म्हणाले, “”बॅंक लुटण्याचे काम गेल्या काही वर्षात झाले. सभासदहिताला तिलांजली देऊन बॅंकेत एकाधिकारशाही होत होती. आरबीआयची नोटीस आल्याने बॅंकेची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. सत्ताधाऱ्यांनी कारभारात सुधारणा करण्याऐवजी मनमानीच केल्याने या निवडणुकीत सभासद त्यांना त्यांची जागा दाखवतील.”
यावेळी दत्तात्रय फरांदे, रवींद्र फरांदे, शरद यादव, दादा कुदळे, राजेंद्र दगडे, शांताराम मासाळ, सचिन पांढरपोटे, विनोद सुतार, नामदेव इथापे, जयश्री शिंदे, मनीषा क्षीरसागर, कविता जाधव, सौ. छाया कदम, शुभांगी गायकवाड, सुशीला यादव, जयश्री ढगे, सौ. सीमा डेरे, छाया जावळे, सौ.सुरेखा ससाणे, उज्वला महामुनी, मुक्ता शिंदे, राणी भिसे आदी उपस्थित होते.
परिवर्तन पॅनेलचा झंझावात
परिवर्तन पॅनेलचे नेते संभाजीराव थोरात, उदय शिंदे, बलवंत पाटील, दीपक भुजबळ, चंद्रकांत यादव, विश्वंभर रणनवरे यांनी जिल्ह्यात परिवर्तन पॅनेलचा झंझावाती प्रचार सुरु केला आहे.सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराचा भांडाफोड ठिकठिकाणच्या सभांमधून होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून अनेकजण परिवर्तन पॅनेलला साथ देत आहेत. वाईसह सर्वच मतदारसंघात परिवर्तन पॅनेलचा झंझावात असून या निवडणुकीत शिक्षक बॅंकेवर परिवर्तन पॅनेलचाच झेंडा फडकेल, असा विश्वास अनेकांनी बोलून दाखवला.