पाचगणी – प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान कबर परिसरात सलग चौथ्या दिवशी महसूल व वन विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये संपूर्ण परिसरातील पाडलेल्या बांधकामांचे डबर, माती, पत्रे व लोखंड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अद्याप संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्तात काम सुरू आहे.
ज्या चौथऱ्यावर अफजलखान कबर आहे तेथील सुमारे चार फूट चौथरा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने हा चौथरा तोडण्याचे काम आज सुरु करण्यात आले. आज अफजलखान व सय्यद बंडा यांच्या कबरीवरील चादर व मोरपीस हटवून हा परिसर अतिक्रमण व उदात्तीकरणमुक्त करण्यात आला. कबरीवरील मजबूत बांधकाम पाडून कबर खुली करुन चार दिवस उलटले तरी कबरीजवळ अद्याप मोठ्या प्रमाणात अत्तराचा घमघमाट आहे.