पुणे -महात्मा फुले मंडई येथे मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या परिसरात मंडईची ऐतिहासिक वास्तू विविध वस्तूंचे मार्केट, दुकाने आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आणि महामेट्रोकडून जुन्या पुण्याची ओळख कायम ठेवत या परिसराचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला असून, महापालिका आणि महामेट्रोकडून संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या विकासासाठी अंदाजे 11 .68 कोटी खर्च येणार असून, पुणे मेट्रो आणि महापालिका मिळून हा खर्च करणार आहे. या कामामुळे मंडई परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन भूमिगत पादचारी मार्गांमुळे पादचाऱ्यांसाठी विनाअडथळा या परिसरात फिरणे शक्य होणार आहे.
“हेरिटेज टूर’मुळे पर्यटकांना या परिसराची माहिती व अनुभव घेता येईल. ओपन एअर थिएटरमुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणे शक्य होणार आहे.
हेरिटेज वॉकही करणार
या परिसरात अनेक जुन्या पुण्यातील इमारती असल्याने कसबा पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग या सर्व ठिकाणांना जोडण्यासाठी आणि “हेरिटेज वॉक’द्वारे या ठिकाणांची माहिती देण्यासाठी पुणे मेट्रो आणि पुणे महापालिका यांनी एक आराखडा बनवला असून, त्यासंबंधीच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
ही कामे केली जाणार…
पादचारी मार्ग आणि भूमिगत पादचारी मार्ग
हेरिटेज वॉक टूरसाठी आवश्यक कामे.
या परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू, तांबट आळी, बुरुड आळी, धार्मिक स्थळे, तुळशीबाग या सर्व ठिकाणे सहज पायी जाता यावे यासाठी सेल्फ गाईडेड ऑडिओ टूर.
मेट्रो कामामुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे मंडईच्या बाजूला नवीन भवन बांधून पुनर्वसन करणार.
नवीन भवन जुन्या मंडईच्या भवनाला अनुरूप असे असेल.
भवनाचे बाह्यरूप हे मंडईच्या हेरिटेज वास्तूसारखे असेल.
टेरेस ओपन एअर थिएटर.
बस थांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीन चाकी, चारचाकी पार्किंग यांचा सर्वसमावेशक विचार करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना.