जुनी सांगवीतील जनजीवन अद्यापही विस्कळीत 

जीवन पूर्वपदावर आणण्याची कवायत सुरूच

पिंपळे गुरव – सुमारे बारा वर्षांनंतर सांगवी गावाने पुराचे रौद्र रुप पुन्हा एकदा अनुभवले. पुराचे पाणी ओसरुन दोन दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप जनजीवन पूर्वपदावर आणण्याची कवायत सुरूच आहे.

पुराच्या पाण्याने सांगवी परिसरातील नागरिकांची मोठी हानी केली आहे. अजूनही कित्येक भागांमध्ये चिखल, घाण, अंधार अशी परिस्थिती आहे. जुनी सांगवीतील पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नागरिकांना आवश्‍यक सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अनेक घरांमधील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या दिवसभर फिरुन नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करत आहेत. दोन दिवस पुराने घातलेल्या थैमानामुळे नदीकाठच्या अनेक घरातील बहुतेक वस्तू खराब झाल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला आहे. विशेषतः गाद्या, उशा, पाण्यामुळे खराब झालेले फर्निचर, कागदांचे गठ्ठे यांचे वजन खूप वाढले आहे. त्यामुळे हा कचरा उचलून गाडीत टाकणे देखील अवघड काम झाले आहे. बहुतेक नागरिकांनी कसा-बसा हा कचरा बाहेर आणून टाकला आहे.

स्वच्छता कर्मचारी खूपच जड झालेला हा कचरा उचलून कचरा गाड्यात टाकत आहेत. प्रचंड प्रमाणात घरातील बाहेर टाकलेले सामान वाहून नेण्यासाठी जवळपास 15 गाड्या सतत शहरात फिरत आहेत. तसेच रोगराई पसरू नये, यासाठी औषध फवारणी, डीडीटी पावडर मारणे, अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. आता या परिसरात आणि प्रत्येक घरात स्वच्छता होणे अत्यावश्‍यक आहे, अन्यथा आजार पसरण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. यामुळे पूरग्रस्त भागांमध्ये दोन वेळेस पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर ओसरल्यानंतर अजूनही अनेक ठिकाणी ड्रेनेजचा गाळ, कचरा, प्लॅस्टीक आढळून येत आहे. अनेक घरातून फ्रीज, कपाट, दीवान, गाद्या, सोफे अशा मौल्यवान वस्तू देखील खराब झाल्यामुळे फेकून देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.