जांभूळ फाटा ते कान्हे खड्यांचे साम्राज्य

वडगाव मावळ – जांभूळ फाटा ते कान्हे महिंद्रा स्टील कंपनीपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला असून पावसामुळे निकृष्ट दर्जाचा सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता जागोजागी वाहून गेला आहे. काही दिवसांच्या पावसातच या रस्त्याला ओढ्याचे व डबक्‍याचे स्वरूप आले आहे.

रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने रोज येथे वाहने घसरुन अपघात होत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धोकादायक ब्रिटिश कालीन पुलावरुन वाहतूक सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मे 2017 रोजी तयार केलेला सिमेंट कॉंक्रिटचा निकृष्ट दर्जाचा रस्ता या पावसात जागोजागी वाहून गेला असून खडी उघडी पडल्याने वाहने घसरुन अपघात होत आहे.

तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगावला जवळचा दळणावळणाचा मार्ग अशी ओळख असलेला जांभूळ फाटा ते कान्हे महिंद्रा स्टील कंपनीपर्यंतचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून कान्हे – टाकवे औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक व इतर वाहतूक होत असते. वाहने ये-जा करताना खड्ड्यातील साचलेले पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असते.वाहनाच्या वर्दळीने या खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याने चालणेही अवघड होत आहे.

या ग्रामपंचायतीला पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार आयएसओ ग्रामपंचायत पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त आहेत. त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे. जांभूळ ग्रामपंचायत परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प असून ग्रामपंचायत हद्दीत दिवसेंदिवस नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे या परिसरातील वर्दळीचा रस्ता तरी चांगला असावा, अशी मागणी पै. अंकुश काकरे, भानुदास जांभूळकर, श्रीपती पोटवडे, अमोल धिडे, सचिन नवघणे, चंद्रकांत काकरे, दत्तात्रय जांभूळकर, लक्ष्मण जांभूळकर, स्वप्निल जांभूळकर व ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.