मुंबई : मागील काही दिवसांपासून ईडीने बड्या नेत्यांवर केलेल्या कारवाईमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांना शिनसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘तूर्त प्रदर्शनाची गरज नाही, रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ’ असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील अशा चर्चा होत्या. एकप्रकारचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केले जाणार होते. पण खुद्द संजय राऊत यांनी मोर्चाच्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सायंकाळी आपली भूमिका समाजमाध्यमांवर मांडली.
“आंदोलनाच्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो.” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.