कापूरहोळ -खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर किकवी (ता. भोर) येथील जनावरांच्या बाजारात दरवर्षी लाखोंची उलाढाल होते. शेतकऱ्याला किकवी येथील जनावरांचा बाजार मध्यवर्ती सोयीचा आहे. करोनामुळे गेले तीन महिने बंद असलेला बाजार गेल्या शनिवारपासून सुरू झाला आहे. भोर, वेल्हा, पुरंदर, खंडाळा, वाई, पाचवड, सातारा परिसरातील व्यापारी व शेतकरी यांनी आज (दि. 13) बाजारात हजेरी लावल्याने लाखोंची उलाढाल झाली.
करोना रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने पुणे जिल्ह्यासह भोर तालुक्यातील जनावरांचे बाजार बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागती, पाळी पेरणीच्या कामासाठी बैलांअभावी मोठी अडचण झाली होती. यासाठी किकवी येथील जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.
त्यानुसानर गेल्या शनिवारपासून किकवी येथील जनावरे बाजार सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत भोर बाजार समितीने पुन्हा सुरू केला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार सुरू झाल्याने येथील परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
किकवी येथील जनावरे बाजारात आज (दि. 13) सुमारे 300 बैलांची आवक झाली, तर 60 ते 70 दुभत्या जनावरांची आवक झाली होती. बाजारात बैलांचे खरेदी विक्रीसह साटे-लोटे व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊन तीस लाखांच्या जवळपास उलाढाल झाली हा बाजार सुरू करताना शेतकरी व्यापाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच येथे सॅनिटायजर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी-व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी बाजार समितीचे कर्मचारी सतत सूचना देत आहेत.
– चंद्रकांत तांदळे, सचिव, भोर तालुका कृषी उत्पन्न
बाजार समिती