पुणे – शहरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली जात आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत करोनाची बाधा झालेल्यांची टक्केवारी 13 वर पोहचली आहे. हा आकडा 27 मे रोजी 8.9 टक्के होता. त्यामुळे चाचण्या वाढल्याने बाधितांची आकडेवारीही वाढत आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल केल्याचा परिणामही बाधितांची संख्या वाढण्यास कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.
शहरात दि. 6 मेपर्यंत दिवसाला फक्त 500 ते 600 चाचण्या करण्यात येत होत्या. त्यानंतर बाधितांची संख्या वाढण्याची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. दि. 12 जूनअखेर दिवसाला आता 2,100 ते 2,200 जणांचे नमुने घेतले जात आहेत. शहरात पहिला करोनाबाधित आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण 66,447 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यात सुमारे 9,082 जणांचा करोनाची बाधा झाली आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत हे प्रमाण 13.6 टक्केवर गेले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 मेपर्यंत शहरात सुमारे 43,907 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात एकूण बाधितांचे पमाण 8.9 टक्के होते. तर 16 मेपर्यंत शहरात सुमारे 29 हजारांवर चाचण्या झाल्या होत्या. त्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या सरासरी प्रतिदिन 9.20 टक्के होती. त्यामुळे चाचण्या वाढत असतानाच आता एकूण चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी 13 वर गेली आहे.
प्रतिलाख 2 हजार चाचण्या
शहरात सध्या प्रतिलाख व्यक्तींमागे सुमारे 1,971 जणांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. हे प्रमाण 16 मे रोजी 1,600 होते. शहरात करोनाबाधित वाढत असल्याने महापालिकेने साथ रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त संशयितांची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे वेळीच निदान झाल्यास करोनाचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे.