नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या रस्त्यांवर ओला-उबेरसारख्या मोबाइल ऍपवर आधारित सुविधेचा मार्ग मोकळा झाला आहे. मोबाइल ऍपवर आधारित टॅक्सी चालवण्यासाठी युनियन टेरीटरी प्रशासनाने लोकांकडून हरकती मागवल्या होत्या. त्यावेळी अनेकांनी सांगितले की ओला-उबेर सारख्या वाहनांमुळे स्थानिक वाहनधारकांना आर्थिक समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या टॅक्सी चालवू नयेत.
याला उत्तर देताना प्रशासनाने ऍपवर आधारित वाहने चालवल्यास प्रवाशांचा प्रवास सुकर होईल आणि लोकांच्या खिशावरही ताण येणार नाही, असे सांगितले. दरवर्षी येणारे लाखो पर्यटक आणि स्थानिक लोकांना याचा फायदा होईल.
यूटी प्रशासनाच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या अंतिम अधिसूचनेत 250 हून अधिक लोकांनी आक्षेप नोंदवले होते. यामध्ये ओला व उबेरसारख्या टॅक्सी चालवल्याने वाहनधारकांना सर्वाधिक फटका बसेल, असा युक्तिवाद 80 टक्के लोकांनी केला होता.
मोठ्या संख्येने लोक टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करतात. अशा स्थितीत तो बेरोजगारही होऊ शकतो. त्यावर परिवहन विभागाकडून लोक बेरोजगार होणार नाहीत, असे सांगण्यात आले. लोक त्यांच्या वाहनांची नोंदणी ऍप आधारित वाहनांमध्ये सहज करू शकतात. त्यामुळे ओला आणि उबेरला राज्यात धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच ऍपवर आधारित वाहने राज्यातील रस्त्यांवर धावताना दिसतील.