संजय कडू
पुणे – लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात महिलांवर अत्याचार आणि गंभीर प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. पुणे विभागीय रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) याबाबत नुकताच अभ्यास करून काही निष्कर्षही मांडले आहेत. यात विशेषत: सायंकाळी चार ते पहाटे चार वाजेदरम्यान हे गुन्हे घडत आहेत. पोलिसांनी जानेवारी 2019 ते जून 2023 या कालावधीतील घटनांची नोंद प्रशासनाने केली आहे. हे लक्षात घेता, पुणे लोहमार्ग पोलिसांचे एक पथक महिलांसंबंधी गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी तैनात असणार आहे.
“बहुतांश लांब पल्ल्याच्या ट्रेन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षेत्रातून सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी जातात,’ असे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. “आम्ही या ट्रेनमधील परिस्थितीचे मूल्यांकन केले आहे आणि महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त योजनेवर काम करत आहोत. आम्ही केलेल्या अभ्यासातील महत्वाचे मुद्दे लक्षात घेता, तत्काळ काही पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने लोणावळा येथे बूथ उभारले आहेत. येथेच विनयभंगाच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. आम्ही बूथवर महिला हवालदारांची नियुक्ती केली आहे आणि तक्रार आल्यास त्यांनी कोणताही विलंब न करता कारवाईचे आदेश दिले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरही हे बूथ कार्यरत आहेत. लोहमार्ग पोलीस अधिकारी फलाटावर सतत गस्तीवर असतात. तेथे नुसतेच फिरणाऱ्या व्यक्तींची सातत्याने तपासणीही केली जाते. यामुळे प्रवाशांव्यतिरिक्त रिकामटेकड्या नागरिकांमुळे महिलांना त्रास होणार नाही. आम्ही रेल्वे संरक्षण बल (आरपीएफ) अधिकाऱ्यांच्या मदतीने लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ट्रेनमध्ये काही चुकीचे आढळल्यास ते आम्हाला कॉल करतात आणि आम्ही पुढील कारवाई करतो,’ असेही धिवरे यांनी सांगितले.
नियमित प्रवाशांचे व्हॉटसऍप ग्रुप
शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त अनेक महिला प्रवासी दररोज लोकल ट्रेन वापरतात. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यासोबत व्हॉट्सऍप ग्रुप तयार केले आहेत. चालत्या ट्रेनमध्ये काही घटना घडल्यास या महिला लोहमार्ग पोलिसांना अलर्ट करतात.
लोहमार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र मोठे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 510 किलोमीटर आहे. त्याचे कार्यक्षेत्र लोणावळ्याजवळील मळवली स्थानकापासून सुरू होऊन कोल्हापूरपर्यंत, दौंडपर्यंत आणि पुढे नगरच्या दिशेने जाते. या विभागात प्रत्येक दिवशी “अप’ आणि “डाऊन’ अशा सर्व 250 हून अधिक ट्रेन धावतात. पुणे लोहमार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा आणि एका बाजूला नगर, छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला लोणावळ्यापर्यंत दक्षिणेकडे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांपर्यंतचे रेल्वे ट्रॅक आणि स्थानके समाविष्ट आहेत.
“ट्रेनमध्ये महिलांच्या बोगीत तसेच इतर डब्यांमध्येही पॅनिक बटण असणे आवश्यक आहे. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण ट्रेनमध्ये रात्री गस्तीवर असावे.प्रवासावेळी संशयित तरुणांच्या गटाची तपासणी केली पाहिजे. याशिवाय आरपीएफ आणि जीआरपी अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म तसेच धावत्या ट्रेनमध्ये असे गुन्हे रोखण्यासाठी सामूहिक बंदोबस्त केला पाहिजे.” – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वे बोगी आणि फलाटावर महिलांसंदर्भात घडलेले गुन्हे
सन 2019 : खून 2, अत्याचार 4, विनयभंग 8, अपहरण 1
सन 2020 : विनयभंग 1, अपहरण 1, आत्महत्येचा प्रयत्न 1
सन 2021 : अत्याचार 1, विनयभंग 5
सन 2022 : खून 1, अत्याचार 1, विनयभंग 4, अपहरण 3
सन 2023 (जूनपर्यंत) : खून 1, अत्याचार 1, विनयभंग 3