मुंबई – रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये रविवारी जागर यात्रा काढण्यात आली. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले होते. “लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार,’ असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आमच्यावर काय केसेस करायचे ते करा. जागे व्हा, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
अमित ठाकरे पुढे म्हणाले, आपण चंद्रावर स्वस्तात पोहोचलो. अवघा 600 कोटींचा खर्च आला. मात्र, जवळपास 15 हजार कोटी खर्च करूनही गेल्या 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय.
आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात तरणखोप ते कासू कोकण जागर पदयात्रा काढण्यात येत आहे. सकाळीच पदयात्रेला सुरूवात झाली.
यात्रेत सहभागी झालेले नांदगावकर म्हणाले, मुंबई महामार्ग लवकरात लवकर व्हावा, हीच आमची मागणी आहे. तर, रत्नागिरीतील चिपळूणमध्येही मनसेची पदयात्रा निघणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातून ही पदयात्रा सुरु होईल. त्यामुळे महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.