टोकियो – जपानमध्ये हनेदा विमानतळावर धावते विमान पेटल्याच्या कारणांचा तपास अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या तपासाचा भाग म्हणून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडील संदेश तपासले जात आहेत. एक प्रवासी विमान आणि जपानच्या तटरक्षक दलाच्या विमानांची धावपट्टीवरच धडक झाल्यामुळे हे प्रवासी विमान पेटले होते.
या आगीमध्ये हे संपूर्ण विमान जळून खाक झाले होते. या विमानातील बहुतेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी आगीमुळे ५ कर्मचारी मृत्यूमुखी पडले असल्याचे जपानच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे.
हे प्रवासी विमान हनेदा विमानतळाच्या ४ पैकी एका धावपट्टीवर उतरले होते, तेंव्हाच तटरक्षक दलाचे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. दोन्ही विमानांची धडक झाल्यावर प्रवासी विमानाने पेट घेतला आणि काही मिनिटातच हे विमान जळून खाक झाले होते.
तटरक्षक दलाच्या विमानाचा वैमानिक जखमी अवस्थेत विमानातून बाहेर पडू शकला. मात्र अन्य ५ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. या विमान अपघातापूर्वी नियंत्रण कक्षाशी झालेल्या ४ मिनिट आणि २७ सेकंदांचे ध्वनिमुद्रण तपासले जात आहे.