सातारा शहरात उन्हाची तीव्रता कायम

तापमान 42 अंशावर : उकाड्याने नागरिक हैराण

सातारा – सातारा शहरात शनिवारीही उन्हाची तीव्रता कायम राहिली. दुपारच्या सूमारास तापमान 42 अंशावर पोहचल्याने नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. दरम्यान, पंख्याच्या हवेने देखील दिलासा मिळत नसल्याने अनेकांनी झाडांचा आसरा घेतला होता. मात्र, एअर कंडिशनर बंगल्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींवर मात्र वाढत्या तापमानाचा कोणताही फरक जाणवून आला नाही.

मागील चार दिवसांपासून शहरात तापमानात कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तापमानाचा पारा तब्बल 42 अंशावर पोहचला होता. त्यामुळे विशेषत: पत्र्याच्या घरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर तसेच शेतात राबणाऱ्या शेतमजूरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाढत्या तापमानामुळे बालचमुंची मैदानावरील खेळण्यासाठी वर्दळ कमी होती. तर दुसऱ्या बाजूला परिसरातील विहीरी अन स्विमींग टॅंकमध्ये पोहायला येणाऱ्यांची संख्या मात्र वाढली होती.

वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम बाजारपेठेवर देखील झाला. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. मात्र, वाढत्या तापमानामुळे कलिंगड, टरबुज, काकडी अशा फळांच्या खरेदीमध्ये मात्र वाढ झाली. तसेच शहरातील आईसक्रीमची दुकाने गर्दीने फुलली होती. दरम्यान, हवमान तज्ञांच्या अंदाजानुसार पुढील आणखी काही दिवस तापमानामध्ये वाढ होणार असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये, असे सल्ला डॉक्‍टरांनी दिला. तसेच अधिकाधिक पाणी आणि नारळपाणी घ्यावे, असे देखील त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.