पोलिसांविषयी खरोखरीच आदर असेल तर साध्वींची उमेदवारी रद्द करा – मिलिंद देवरा

देवरा यांनी दिले मोदींना आव्हान
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र पोलिसांबद्दल खरोखरीच आदर असेल; तर त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने दिलेली उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी शनिवारी दिले.
मोदींची शुक्रवारी मुंबईत सभा झाली. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस सरकारांनी पोलीस दलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या कार्याची स्तुतीही केली. त्यावरून देवरा यांनी निवेदन जारी करून पलटवार केला. सशस्त्र दलांचा आणि शूर पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना मोदी प्रोत्साहन का देत आहेत? त्यांनी साध्वींचे तिकीट तातडीने रद्द करावे. शहीद हेमंत करकरे यांच्या सन्मानासाठी किमान ते पाऊल तरी ते उचलू शकतात. शहिदाच्या अपमानाबद्दल शिवसेनेने बाळगलेले मौन चकित करणारे आहे, असेही देवरा यांनी म्हटले. मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी असणाऱ्या साध्वींनी काही दिवसांपूर्वी करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. वादंग निर्माण झाल्यावर आणि टीकेची चौफेर झोड उठल्यावर त्यांनी ते वक्तव्य मागे घेतले. साध्वींना भाजपने मध्यप्रदेशच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.