जुलै 2017 पासून 7 टक्के व्याजाने पैसे देण्याचे आदेश
पुणे – नमुना 6-ड (जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणीचा फेरफार) उतारा दिला नसल्याने व्यक्ती शेतकरी होत नसल्याचे सांगून क्लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला अतिरिक्त ग्राहक मंचाने दणका दिला आहे.
त्यांनी सात-बारा आणि 8-अ चा उतारा दिलेला आहे. केवळ 6-ड चा उतारा दिला नाही, म्हणून व्यक्ती शेतकरी नसल्याचे सांगून क्लेम नाकारणे अयोग्य असल्याचा निष्कर्ष मंचाने काढला आहे. तक्रारदारांना या प्रकरणात शेतकरी अपघात नुकसानभरपाई म्हणून 2 लाख रुपये 29 जुलै 2017 पासून 7 टक्के व्याजाने देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी दिला आहे. नुकसान भरपाईपोटी 25 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.
बेबी रंगराव सोनी (शेंबाळ पिंपरी, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी दि ओरिएन्टल इन्श्युरन्स कं.लि. (जे.एन.रस्ता) च्या विरोधात येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. बेबी यांचे पती रंगराव हे शेतकरी होते. ते 29 जुलै 2017 रोजी दुचाकीवरून पुसद येथून शेंबाळ पिंपरी येथे चालले होते. त्यावेळी समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना गाडीला धडक दिली. ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बेबी यांनी तलाठ्यांकडे आवश्यक कागदपत्रांसह विम्याचा दावा दाखल केला.
विमा कंपनीने हा दावा नाकारला. 6-ड उतारा दाखल केला नसल्याने आणि त्यांच्याकडे वैध वाहन परवाना नसल्याने क्लेम नाकारल्याचे विमा कंपनीने मंचात सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर “रंगराव हे शेतकरी आहेत. तसेच त्यांचा अपघात त्यांनी वाहन चुकीच्या पद्धतीने चालवल्याने झाला नाही. तर, समोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाताने झाला आहे. त्यामुळे चुकीच्या कारणाने क्लेम नाकारला जात आहे,’ असा निष्कर्ष काढला.