दिलासादायक स्थिती : प्रयत्न ठरले परिणामकारक
पिंपरी – ऑक्टोबर महिन्यात शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे. परंतु याहून दिलासादायक बाब अशी की करोनाचा संसर्ग दर देखील घटतो आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण चाचण्यांपैकी 24.29 टक्के रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. तर ऑगस्टमध्ये हे प्रमाण 27 टक्क्यांच्या पुढे गेले होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मात्र आतापर्यंतचा संसर्ग दर 21.75 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या चाचण्यांपैकी अवघ्या 11.69 टक्के इतक्याच रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले.
मार्च महिन्याच्या 11 तारखेला शहरात करोनाने प्रवेश केला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच करोनाचे रुग्ण संपतील असे वाटत असतानाच रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून ठाण मांडून बसलेल्या करोनाने आजपर्यंत शहरातील 87594 नागरिकांनी बाधित केले आहे.
गेल्या आठ महिन्यांमध्ये शहरातील चार लाखांहून अधिक नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. करोनाचा आलेख सप्टेंबर अखेरपर्यंत वाढताच होता. तो ऑक्टोबरमध्ये काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे.
एप्रिल महिन्यात नव्याने रुग्ण आढळल्यानंतर 4.04 टक्के इतका संसर्ग दर होता. एप्रिल आणि मे या काळात करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जात होत्या. तरी देखील संसर्ग दर दहा टक्क्यांहून कमी होता.
जून महिन्यात तर करोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आणि एकूण चाचण्यांपैकी 18.44 टक्के लोकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जुलैमध्ये संसर्ग दरात दोन टक्क्यांनी वाढ होत बाधित होण्याचे प्रमाण चाचण्यांच्या तुलनेत वीस टक्क्यांच्या जवळपास पोहोचले होते. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतींमुळे करोनाने ऑगस्ट महिन्यात मोठी उचल खाली आणि एकूण चाचण्यांपैकी 27.27 टक्के नागरिकांना बाधित केले. सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते.
या महिन्यात जवळपास तीस हजार रुग्ण आढळले होते. परंतु चाचण्याही मोठ्या प्रमाणात होत होत्या. रुग्ण अधिक सापडत होते तरी देखील संसर्ग दर मात्र काहीसा कमी होत 24.29 टक्क्यांवर येऊन पोहोचला.
सप्टेंबरमध्ये करोनाचा कहर शहरवासीयांना पहावयास मिळाला. या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होतेच, मृत्यू देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले होते. ऑक्टोबर येताच गेल्या सात महिन्यापासून चढा असणारा करोनाचा आलेख उतरु लागला. सप्टेंबर महिन्यात रोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. ते ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत दोनशेपेक्षाही कमी झाले. सर्वेक्षण मोहीम व इतर उपाययोजनांचा परिणाम जाणवू लागला आणि रुग्णांच्या संख्येसोबतच संसर्ग दरात घट दिसून आली. ऑक्टोबरमध्ये घटलेल्या रुग्णसंख्येमुळे शहरातील आतापर्यंतचा संसर्ग दर 21.75 टक्के खाली घसरला.
ऑक्टोबर महिन्यात मोठी घट
आतापर्यंतचा एकूण संसर्ग दर 21.75 टक्क्यांपर्यंत खाली घसरला असला तरी ऑक्टोबर महिन्याचा संसर्ग दर मात्र बारा टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 81351 नागरिकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 9513 जणांना करोनाची लागण झाली आहे. याचाच या महिन्यात घेण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 11.69 टक्के जणांनाच करोनाची लागण झाली आहे.