पिंपरी – तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरदार दरमहा किती बचत करता त्यावर तुमचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते. तुमच्याकडे बचत नसेल तर तुम्हाला अचानक उद्भवलेल्या अडचणीच्या परिस्थितीत कर्ज काढण्याची नामुष्की ओढवू शकते. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात बऱ्याच जणांना या बचतीच्या पैशाने तारले आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी बचत ही महत्त्वाचीच असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
समाजात वावरताना माणसाला सगळी सोंगे करता येतात. मात्र, पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी थोड्या-थोड्या प्रमाणात का होईना बचत करावी. सध्या महागाई वाढल्याने खर्चाचे बजेट वाढले आहे. त्यामुळे बचत काळाची गरज आहे.
दरवर्षी 31 ऑक्टोबरला जगभरात जागतिक बचत दिवस पाळला जातो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ देशात जागतिक बचत दिवस पाळला जातो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक हा त्या-त्या देशाच्या विकासाचा भक्कम पाया असतो.
देशाच्या नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली असेल तर देशाची आर्थिक स्थितीही आपोआपच भक्कम होते. त्यामुळेच देशाच्या नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे हे प्रत्येक देशाचे महत्त्वाचे धोरण असते. या धोरणाला सर्वात सहाय्यभूत ठरणारी गोष्ट असते ती म्हणजे बचत. बचत हेच आपल्या व्यवसायात चांगली सुरुवात करण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी तसेच चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. बचत करण्याच्या सवयीमुळे व्यक्ती आणि देश पुढे जाण्यास मदत होते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत “आरोग्य हेच धन’ मानले जात असले तरीही आरोग्यासाठी पैसा आणि पैशांसाठी बचत आवश्यक आहे.
बचत कशी कराल?
दैनंदिन खर्चावर नियंत्रण करून, खर्चाचे नियोजन, खर्च गरज पाहून करावा, पैसा घरी न ठेवता बॅंक किंवा पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडून ठेवावा, मुदतठेव (एफडी), आवर्त ठेव (रिकेरिंग) जीवनविमा आदी. गुंतवणूक करून बचत करणे शक्य आहे.
प्रत्येकाने आपल्या उत्पन्न आणि गरजांनुसार बचत करण्याची सवय अंगी बाणवायला हवी. ज्यांना सहा महिन्याने, वर्षभराने पैसे लागतात त्यांनी चांगल्या बॅंका, पतसंस्था आदींमध्ये मुदतठेवीच्या (एफ.डी.) स्वरुपात गुंतवणूक करावी. शेअर बाजारात केलेली दीर्घकालीन गुंतवणूक हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. ज्यांना लगेच पैशाची गरज नाही आणि रिस्क घेण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. त्याशिवाय, सोन्यामध्येही दीर्घकालीन गुंतवणूक करता येईल. जीवनविमा, आरोग्यविमा यातील गुंतवणूक गरजेचीच आहे.
– चंद्रकांत कासट, चार्टर्ड अकाऊंटंट