पुणे – व्यापाऱ्याच्य पोटास पिस्तूल लावून 44 हजाराची रोकड लूटण्यात आली. ही घटना केशवनगर-मुंढवा येथील गणेश टिंबर मार्केट येथे घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जलाराम प्रभुजी प्रजापती (45,रा.मांजरी) यांचा केशव नगर येथे गणेश टिंबर मार्केट नावाने व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुकानात दोन व्यक्ती ग्राहक म्हणून आल्या. तेव्हा जलाराम हे एकटेच दुकानात होते. त्यातील एकाने अचानक तुम्हारे पास वीस लाख रुपये आये है, पैसे निकालो अशी दमदाटी केली. यानंतर शर्टाच्या आतील बाजूस कमरेस खोवलेली पिस्तूल काढली. पिस्तूलचे मॅगझीन खोलून त्यात गोळ्या असल्याचे जलाराम यांना दाखवले.
यानंतर ते पिस्तूल त्यांच्या पोटास लावून धमकावले. तर दुसऱ्या साथीदाराने दुकानाचे गल्ले चेक करत त्यात वीस लाख रुपये आहेत का हे तपासले. त्याला गल्ल्यात 20 लाख रुपये न मिळाल्याने गल्लयात जमा झालेली 44 हजार 500 रुपयांची रोकड घेतली. दरम्यान त्यांनी तुम्हारे बच्चे को पाच लाख रुपये लेके बुलावो असा दम भरला होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदन करत आहेत.