शाळा, महाविद्यालयांमुळेच करोनात वाढ

टाटा संस्था आणि आयसर संस्थेचा निष्कर्ष

पुणे – शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्यानेच शहरातील व ग्रामीण भागातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्याचबरोबर रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्याचा परिणामही या वाढीवर झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था या प्रायोगिक तत्वावर दोन महिने बंद ठेवाव्यात आणि रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा सुरु ठेवण्याची सूचना आयसर आणि टाटा समाजशास्त्र संस्थेच्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विधानभवन येथे या अहवालाचे शुक्रवारी सादरीकरण झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मागील महिन्यापासून करोना बाधितांची संख्या वाढत आहे.

खाली आलेला करोना बाधितांच्या संख्येचा आलेख अचानक वाढल्याने लॉकडाऊन लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, वेळीच यावर उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याने विभागीय आयुक्‍तांनी आयसर व टाटा संस्थेला अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आतापासून नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली तर करोनाची स्थिती नियंत्रणात येईल, अशा विश्‍वास सुध्दा यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाटा संस्था व आयसर संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांनी करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना सुचविल्या आहेत. या संस्थेला पुन्हा सुधारित अहवाल येत्या बुधवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालावर गुरुवारी चर्चा करण्यात येईल.

तसेच शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल. मात्र दि. 14 मार्चपर्यंत तरी कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.