पुणे – सांगुनही माहेरहून पैसे आणत नसल्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने वरंधा घाटात नेवून दरीत ढकलून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ही घटना सुमारे साडेआठ वर्षांपूर्वी घडली.
विक्रम शंकर शेवते (वय 40, रा. मांजरी रस्ता, हडपसर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुनीता हिचा खून केला होता. याबाबत सुनिताच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 13 जुलै 2012 रोजी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी 19 साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलीस निरीक्षक अजित खडके यांनी या प्रकरणाचा तपास केला.
न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल पी.पी.पवार, ए.एस.गायकवाड आणि उपनिरीक्षक पांडे यांनी मदत केली. विक्रम याचा घटनेच्या आठ वर्षांपूर्वी सुनीता यांच्याशी विवाह झाला होता. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी सुनीता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असत. त्रास असह्य झाल्याने सुनीता यांच्या वडिलांनी म्हणजे फिर्यादींनी 1 लाख रुपये सासरच्या लोकांना दिले होते.
त्यानंतरही माहेरहून पैसे आणण्यासाठी त्यांना त्रास देण्यात येत असत. मागणी पूर्ण करत नसल्याने टाटा सफारी गाडीतून फिरविण्याच्या बहाण्याने भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट येथे घेऊन गेले. तेथील कावळाकडा येथे खाली उतरून दरीत ढकळून देऊन खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.