– सुबोध रणशेवरे
मुंबई – मुंबई सारख्या दाट लोकवस्तीच्या शहराला सिमेंटच्या जंगलाने व्यापलेले असले तरी
याच महानगरात पूर्वापार मोठे समुद्र ,डोंगर ,विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीव अशी प्राचीन जैवविधता टिकून आहे .
या समृद्ध अशा जैवविविधतेची इथल्या नागरिकांना ओळख करून देण्यासाठी आणि याच जैवविविधतेचं संवर्धन होण्यासाठीच ग्रीन हुमर फेम व्यंगचित्रकार रोहन चक्रवर्ती यांनी मुंबईतील जैवविविधतेच दर्शन केवळ एका क्लिकवर घडविणाऱ्या अनोख्या नकाशाचे सादरीकरण केले आहे.
मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या बायोडायव्हर्सिटी बाय द वे या संस्थेच्या अभियानानंतंर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे . हा मूळ नकाशा गेल्या वर्षी तयार करण्यात आला होता. मात्र आता त्यामध्ये अभिनव स्वरूपाचे बदल करून हा नकाशा सादर करण्यात आला असून तो https//ministryofmumbaismagic.com /biodiversity -map या लिंकवर उपलब्ध करण्यात आला आहे .
या नकाशाचे खास वैशिष्ट्य हे आहे कि मुंबई महानगरातील अनेक जलसंचय, माहीमची खाडी ,ठाणे खाडी, वसईची खाडी, अरबी समुद्र आणि यामध्ये असलेले असंख्य वन्यजीवांच्या प्रजाती आणि दुर्मिळ वनस्पतीच्या प्रजाती असा खजाना आहे.
विविध शाळांचे ,महाविद्यालयांचे विद्यार्थी ,पर्यावरण प्रेमी आणि मुंबई सारख्या शहरांचा अभ्यास करणारे संशोधक अशा सर्वांसाठी केवळ एका क्लिकवर हा संपूर्ण खजिना उपलब्ध होणार आहे. या नकाशावर ठराविक विभागावर क्लिक केले असता त्या प्रदेशातील दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव यांची माहिती कळणार असून त्याचे संवर्धन कसे करायचे ?त्यासाठी कोणत्या संस्था उपयुक्त आहेत ? याची सचित्र माहिती मिळणार आहे .
मुंबई सारख्या महानगरात असलेला हा समृद्ध जैवविविधता खजाना नष्ट होऊ नये ,त्याचे संवर्धन व्हावे आणि हि जाणीव मुंबईकरांना व्हावी यासाठी या नकाशाची संकल्पना असून याच निमित्ताने हि जैवविविधता टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इथल्या आदिवासी ,कोळी बांधवांचा देखील परिचय करून देण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातूनच महापालिकेशी चर्चा करण्यात येणार असून मुंबईतील
जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना देखील पत्र लिहिण्यात येणार आहे.
या नकाशांसाठी वन्यजीवतज्ञ आणि वन्यजीव छयाचित्रकार राजेश सानप ,केलं ल्यू ,आशिष चलपूरम, प्रदीप पलांडे आणि चंदन झवेरी यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे .