वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेत नुकत्याच वाघोलीचा समावेश झाला असून वाघोलीची लोकसंख्या जवळपास दोन लाखाच्या आसपास पोहोचली आहे. या लोकसंख्येचा विचार करून सांडपाणी, कचरा, पिण्याचे पाणी तसेच इतर समस्यांबाबत वाघोलीकर वेळोवेळी मागणी करत असताना तातडीने वाघोली मधील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी
वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच समीर भाडळे, महेंद्र भाडळे, गणेश सातव, आदींच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांची भेट घेऊन वाघोलीतील समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला.
“वाघोली मधील पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा प्रश्न तसेच नागरिकांच्या इतर समस्यांबाबत शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वडगाव शेरी चे आमदार सुनील टिंगरे व महानगरपालिका प्रशासन यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
यावेळी माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की वाघोली ची लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येनुसार समस्या देखील त्याच प्रमाणात वाढत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगर पालिकेने विशेष लक्ष देणे गरजेचे असून वाघोली मधील वाड्या-वस्त्या वरील तसेच सोसायटी मधील कचरा त्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून महानगरपालिकेने तातडीने या प्रश्नी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी दाभाडे यांनी केली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त सुहास जगताप, वाघोली चे अधीक्षक संजय शिवले यांचा वाघोली चा पदभार स्वीकारला बद्दल सत्कार करण्यात आला.