सातारा – जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कचाट्यातून सुटलेल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नवीन इमारतीत ऐतिहासिक वस्तू स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे. या संग्रहालयातील शिवकालीन तोफा शुक्रवारी रिमझिमत्या पावसामध्ये नवीन इमारतीत पाठवण्यात आल्या. त्यामुळे शिवाजी संग्रहालयाची इमारत लवकरच ऐतिहासिक ठेवींनी सुसज्ज होण्याच्या कामांना गती मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा येथे छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम जुन्या इमारतीतून सुरू होते. मात्र, ही इमारत गळकी असल्याने आतील ऐतिहासिक दस्तऐवज, आयुधे, कागदपत्रे, छत्रचामरे, सिंहासने, तोफा यांची खूप काळजीपूर्वक देखभाल करावी लागत होती.
शिवाजी संग्रहालयासाठी बांधण्यात आलेली नवीन इमारत जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी 19 महिने वापरण्यात आली. या इमारतीचा ताबा जिल्हा प्रशासनाने नुकताच पुरातत्व विभागाकडे सोपवल्याने हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती आली आहे. बरेचसे साहित्य अत्यंत काळजीपूर्वक नवीन इमारतीत स्थलांतरित होत आहे.
शिवाजी संग्रहालयाच्या जुन्या इमारतीसमोर असणाऱ्या जुन्या तोफा, तोफ गोळे, ऐतिहासिक दस्तऐवज, काही हत्यारे ही शासकीय निगराणीखाली शुक्रवारी एका वाहनांमधून नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. या कामात अभिरक्षक प्रवीण शिंदे आणि त्यांच्या बारा सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. नूतन इमारतीत छत्रपती शिवाजी संग्रहालय सुरू होत असल्यामुळे सातारकर सुखावले आहेत.