पिंपळे गुरव – दापोडी येथील जय भीमनगर परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले होते. परंतु काही दिवस उलटले की पुन्हा मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने महापालिकेने केलेल्या कामाविषयी परिसरात चर्चा सुरू झाली आहे. दूषित पाण्यामुळे व दुर्गंधीमुळे दापोडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने जय भीमनगर येथील ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले होते. पावसाळ्यात या परिसरात ड्रेनेजलाइन तुंबून नागरिकांच्या घरादारांत पाणी शिरले होते. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर व स्थानिक माजी नगरसेवक रोहित काटे यांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने काही दिवसांपूर्वी येथील ड्रेनेजलाइनचे काम केले होते. परंतु ते काम दर्जेदार न झाल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण झाली आहे.
जय भीमनगर परिसरात दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अडचणी येत आहेत. महापालिकेने ड्रेनेजलाइनचे काम करताना उरलेला राडारोडा व गाळ सिमेंटच्या गोण्यांमध्ये भरून ठेवले आहे. ते अद्याप उचलले नाही. गाळ, मैला यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सांगून येथील समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जय भीमनगर येथे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजलाइनचे काम केले आहे. परंतु ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे नगारिकांना ड्रेनेजलाइनचा त्रास होत आहे. ड्रेनेजलाइन तुंबून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच गावठाण परिसरात चेंबर दुरुस्तीचे काम करून चेंबरमधील मैल व माती पोत्यात भरून ठेवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील परिसराचे साफसफाई करून काम चांगले करून द्यावे.
– रोहित काटे, माजी नगरसेवक.
लूकस मुगुटमल दापोडी नागरी
दापोडी परिसरात ड्रेनेज विभागाने कामे व्यवस्थितपणे केली नाहीत. राडाराडा घाण सर्व या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक आजारी पडत आहेत. ड्रेनेजलाइनचे काम व्यवस्थित करून द्यावे.
– लूकस मुगुटमल, नागरिक.
दापोडी परिसरात आम्ही कामे करत आहोत. जय भीमनगर परिसरात काम सुरू आहे. रोड लहान असल्यामुळे त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होत आहेत. जर कुठे काही समस्या राहिली असेल तर ते सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ड्रेनेजलाइनचे काम करून झाल्यानंतर काही राडाराडा शिल्लक राहिला असेल तर साफ करून घेण्यात येईल.
– विजय जाधव, अभियंता, स्थापत्य विभाग.