पुणे – पीएमआरडीएकडून आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपूल तसेच मेट्रो मार्गाचे काम पुढील काही दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ चौकात येणारी वाहतूक शिवाजीनगर तसेच औंध येथील ब्रेमेन चौकातून वळविण्यात येणार असल्याने त्यासाठी महापालिकेकडून स्पायसर महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली.
यावेळी खडकी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या साई चौकापासून ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने संयुक्त कारवाई करून ही अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या भागात रात्रीतच रस्ता केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यापीठ चौकातील मुख्य पूलाचे काम सुरू करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसह, वाहतूक पोलीस तसेच पीएमआरडीएच्या अधिकार्यांची संयुक्त पाहणी झाली.
तसेच गणेशखिंड रस्त्यावर वाहतूकीसाठी केवळ ३ मीटरचा रस्ता उपलब्ध राहणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कृषी महाविद्यालय चौक आणि ब्रेमेन चौकातून वळविण्याचा पर्याय निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रेमेन चौकातून शिवाजीनगरकडे येणारी वाहने स्पायसर महाविद्यालय रस्त्याने पुढे खडकी स्थानकाच्या पश्चिम भागातून अंडी उबवणी केंद्राकडून शिवाजीनगरकडे जाणार आहेत. त्यामुळे साई चौकातील रस्ता मोठा करण्यासाठी ही अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.