पुणे – महापालिकेकडून आजपासून शहरात पुणेकरांना ई-वाहनांसाठी चार्जिंगससाठी २१ स्टेशन सुरू करण्यात आली असली तरी काही स्टेशनवर चक्क प्रतीयुनिट २३ रूपयांपेक्षा अधिक दर आहे. पालिकेच्या या स्टेशनवर चार्जिंगसाठी मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून यावर चार्जिंग स्टेशन निवडल्यानंतर प्रती युनिट दर देण्यात आले आहे. हे दर प्रत्येक ठिकाणी वेगळे असून या दरावर चक्क जीएसटी आकारण्यात आल्याने प्रती युनिट खर्च अनेक स्टेशनवर २३ रूपयांपेक्षा अधिक दर्शविला जात आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आज या सर्व स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. महापालिका शहरात सुमारे ८२ ठिकाणी हे स्टेशन उभारणार असून त्याला पालिका जागा देणार आहे. तर, इतर सर्व सुविधा संबंधित ठेकेदार कंपनी पुरविणार आहे.
महापालिकेने लपविले दर…
शहरात २१ ई-चार्जिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहेत. ही स्टेशन सुरू करण्यापूर्वी पालिकेने प्रती युनिट १३ ते १९ रूपये चार्जिंगचे दर असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या दरावर जीएसटी तसेच अन्य कोणते खर्च भरावे लागतील याची माहिती देण्यात आली नव्हती. आज नागरिकांनी चार्जिंग स्टेशनवर मोबाइल अॅप डाऊनलोड करून त्यावर चार्जिंगचे दर तपासले असता हे दर चक्क २२ रूपये ते २४ रूपयांपर्यंत असल्याचे दिसून आले.
“‘आजपासून केंद्र सुरू केले आहे. आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या १३ ते १९ रूपयांमध्ये दर ठेवावा. मात्र, त्यांनी दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्ह्या एकदा सूचना देण्यात येतील.” – डाॅ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका