प्रत्येक होम क्वारंटाइन व्यक्तीला “डिजिटल हजेरी’ होणार सक्तीची
पुणे – परदेश प्रवास करून आलेल्या, मात्र त्या प्रवाशांना करोनाची लक्षणे आढळून न आल्याने त्यांना 14 दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) केल्यानंतरही संबंधीत व्यक्ती समजामध्ये फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे होम क्वारंटाइन व्यक्तीवर लक्ष ठेवन्यासाठी पुणे पोलिसांनी “महाराष्ट्र होम क्वारंटाइन ट्रॅकिंग सिस्टिम’ (महा एचक्युटीएस) हे स्वतंत्र मोबाइल ऍप तयार केले आहे. त्यामुळे आता होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती पोलिसांच्या ऑनलाइन देखरेखीखाली राहणार आहेत.
दरम्यान, होम क्वारंटाइन काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. अशा व्यक्ती घरी असल्याची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पुणे पोलिसांनी अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी 152 पोलीस पथके तयार केली होती. त्यांच्यामार्फत 1,276 होम क्वारंटाइन प्रत्येक व्यक्तिच्या घरी जाऊन तो हजर असल्याची खात्री केली होती. तर दुसऱ्या टप्प्यात घरी मिळून आलेल्या व्यक्तींचा दररोजचा संपर्क टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना व्हॉट्स ऍप व्हिडिओ कॉल करून त्यांच्या घरातील विशिष्ठ जागेवर उभे राहून उत्तर देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्या व्यक्ती घराबाहेर पडतात का? याची खातरजमा करण्यासाठी शेजारी कुटुंबाची निगराणीकामी मदत घेण्यात येत आहे.
असे आहे “महा एचक्यूटीएस’
पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून पुणे पोलिसांनी बेंगळुरु येथील कोटा व्हिजन लॅबच्या मदतीने फेशिअल रिकगनेशन सिस्टिम (ऋरलळरश्र ठशलेसपळींळेप ीूींशा) आधारित स्वतंत्र मोबाइल ऍप विकसित केले आहे. यावर विभागीय आयुक्त कार्यालयाकडील संकलित केलेली माहिती संबंधीत वेबसाइटवर नोंदणी केली आहे. तर काहिंना ही माहिती भरण्यासाठी मेसेजही पाठवले आहेत.
महा एचक्यूटीएसची वैशिष्ट्ये
– होम क्वारंटाइन व्यक्तिला विशिष्ठ ठिकाणी उभे राहून किंवा घड्याळासमोर आपल्या मोबाइललवर सेल्फी घेऊन तो फोटो या ऍपवर अपलोड करावा लागणार आहे.
– संबंधीत ठिकाणचे भौगोलिक अक्षांश/ रेखांश स्थान नोंदवले जाणार आहे.
– होम क्वारंटाइन व्यक्तीने सदर एका दिवसांत सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत किमान दोन वेळा आपला फोटो अपलोड करायचा आहे.
– होम क्वारंटाइन व्यक्तीने तसे न केल्यास त्याची अनुपस्थिती लागेल. त्यानंतर काही वेळातच पोलिसांच्या पद्धतीनुसार त्याची पडताळणी होईल.
– पोलीस कर्मचाऱ्याला होम क्वारंटाइनच्या घरी जावे लागणार नसल्याने करोनाचा संसर्ग टळणार आहे.
– होम क्वारंटाइनच्या मागावर राहण्यासाठी होणारे श्रम व वेळही वाचणार आहे.
– हे ऍप गुगल प्लेस्टोअरवरून उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे.
याद्वारे पोलिसांना संशयित करोना संसर्गित व्यक्तींवर बारकाईने व बिनचूक लक्ष ठेवता येइल.
या ऍपची उपयोगिता लक्षात घेऊन राज्यातील अनेक जिल्ह्यांत या प्रणालीचा वापर होणार होणार आहे.