पिंपरी – वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मोशी येथून मंगळवारी (दि. 26) रात्री अटक केली.
कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एस. मुदल आणि चार कर्मचारी हे गंभीर स्वरूपाची दुखापत करणे, या गुन्ह्याखाली अटक केलेल्या आरोपींना घेऊन मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आले होते. तेव्हा तीन आरोपींनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन आरोपींना पोलिसांनी जागीच जेरबंद केले. तर आरोपी कृष्णा सोनवणे याने धूम ठोकली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आरोपी पळून गेल्यानंतर तो नाशिकफाटा येथे गेला. जवळ पैसे नसल्याने त्याने एका वाहनचालकाकडे मदत मागितली. तेथून तो मोशी येथे गेला. एका मित्राकडून पैसे घेऊन तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गणेश सावंत यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी कृष्णा सोनवणे याला अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी सचिन उगले, विजय मोरे, खेसे, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.