पुणे – सासऱ्याने जावयाचे अपहरण करुन जावयाला तीन दिवस गोठ्यात बांधून मारहाण केली. याप्रकरणी जावयाने सासऱ्यासह सात जणांविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विनोद साहेबराव आडे (25,रा.येरवडा, मुळ बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार प्रकाश गेमा राठोड, रमेश गेमा राठोड, मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड( सर्व रा.बीड) यांच्याविरुध्द अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनोद आडे हे नोकरीनिमीत्त पत्नी व एक वर्षाच्या मुलीसह येरवडा येथे राहतात. त्यांच्या पत्नीने जुलै महिन्यापासून सोन्याचे मणी मंगळसूत्र घेण्यासाठी हट्ट धरला होता. तिचीवारंवार समजुत घातली असता ती उलट विनोद यांनाच शिवीगाळ करणे, उलट उत्तर देणे आणि हाताला चिमटे घेण्यासारखे प्रकार करत होती. दरम्यान, तीन सप्टेंबर रोजी तिने पुन्हा वाद घालून नातेवाईकांना फोन करुन विनोद यांनी मारहाण करुन टेरेसवरुन फेकत असल्याचे खोटे सांगितले. यामुळे पहाटे दोन वाजता त्यांचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरे रमेश राठोड, दादासाहेब राठोड आणि मामा सासरे योगश वडते, मंगेश वडते आणि आणखी एक व्यक्ती बीडवरुन त्यांच्या घरी आले.
त्यांनी विनोद यांना मारहाण करुन जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत कोंबले. यानंतर गाडीत मारहाण करत करत गेवराई,बीड येथे सासूरवाडीला आणले. त्यानंतर पुन्हा लाथा-बुक्क्याने मारहाण करत विनोद यांना त्यांच्या नावावर असलेली जमिन पत्नीच्या नावावर करण्यास सांगितले. विनोद यांना तीन दिवस हाताला दोरीने बांधून घरासमोरील गोठ्यात बांधून ठेवले होते. त्यानंतर मारहाण करुन सहा तारखेला सोडून दिल्यानंतर विनोद येरवडा येथे परतले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक होले करत आहेत.