राहाता -तालुक्यातील निमगाव येथील भाजी विक्रेती असलेल्या करोनाबाधित महिलेच्या कुटूंबातील आणखी चार जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे निमगाव येथील करोनाबाधित रूग्णांची संख्या सहा झाल्याची माहिती राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. दरम्यान, निमगावसह जवळ असलेल्या शिर्डी परिसरात व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली.
बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही महिला भाजी विक्रेती आहे. तिने शिर्डीतील साईबाबा रूग्णालयात सलग चार दिवस उपचार घेतले होते. तिचे शिर्डीतील नातेवाईकाकडेही वास्तव्य झाले होते. त्यामुळे या महिलेच्या कुटूंबातील पाच जण, साईबाबा रूग्णालयात उपचार घेताना संपर्कात आलेले बारा जण, शिर्डीतील नऊ नातलग व सावळेविहीर येथे उपचार करणाऱ्या एका डॉक्टरासह 27 व्यक्तींना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते.
यातील हाय रिस्क असलेल्या या महिलेच्या कुटूंबातील व्यक्तींचे स्त्राव प्राधान्याने तपासण्यात आले. त्यात या महिलेचा पती, एक मुलगा, सुन व नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तालुका प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले आहेत सायंकाळी या महिलेचा 20 वर्षीय नातवाला देखील करोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले.
या महिलेच्या एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो साईबाबा रूग्णालयात नोकरीस आहे. मात्र तो 20 मेपासून कामावर आलेला नाही. या कुटूंबातील एक महिला शिर्डीत येवून राहिली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. पण तिच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी सकाळी अहवाल प्राप्त होताच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के, डॉ संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमची बैठक झाली.