अहमदाबाद – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद इथे येण्याच्या एक दिवस आगोदर नव्याने उभारण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये “व्हीव्हीआयपी’ प्रवेशद्वार बाहेरच्या बाजूस उन्मळून पडले. आज सकाळी सोसाट्याचे वारे सुटले होते. त्यामुळे हे प्रवेशद्वार उखडून पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोटेरा स्टेडियमचे प्रवेशद्वार कोसळण्याची ही संपूर्ण घटना तेथेच उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीत केली आणि हे चित्रीकरण स्थानिक टेलिव्हिजन वाहिन्यांवरून प्रसारित केले. हे प्रवेशद्वार स्टीलच्या रॉडचे वेल्डींग करून उभे केले गेले होते. त्या प्रवेशद्वारावर ट्रम्प यांच्या स्वागताचे फ्लेक्स चढवण्यात आले होते. हे मुख्य प्रवेशद्वार कोसळल्यानंतर अल्पावधीतच वादळी वाऱ्यामुळे स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दुसऱ्या तात्पुरत्या प्रवेशद्वाराचा काही भागही कोसळला. या दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही आणि ही प्रवेशद्वारे पुन्हा उभारण्याचे काम सुरू असल्याचे अन्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
“फॅब्रिकेशनचे काम सुरू असताना हे व्हीव्हीआयपी गेट कोसळले. ही किरकोळ घटना आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.’ असे गुन्हे शाखेचे विशेष पोलीस आयुक्त अजय तोमर यांनी सांगितले.
उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. त्यानंतर मोटेरा इथल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये “नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात दोघेही सुमारे लाखभर नागरिकांना संबोधित करणार आहेत. तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसविण्याची क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. यापूर्वीचे 49,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले जुने स्टेडियम पाडून त्याच्या जागेवर हे नवीन स्टेडियम उभारण्यात आले आहे.